‘राष्ट्रवादी’चा एकमेव नगरसेवक; पण महापौरासाठी घेतला अर्ज

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (दि. ४) अर्जाचे वितरण सुरू झाले. सत्तेचा दावेदार असलेला भाजप पक्षाचा महापौरपदाचा उमेदवार ठरत नसल्याने पहिल्या दिवशी भाजपचा एकही नगरसेवक फिरकला नाही. पण महापालिका निवडणुकीत एकमेव नगरसेवक निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव नगरसेवक सतिंदरसिंग (नवीनसिंग) ओबेरॉय यांनी महापौर, उपमहापौर या दोन्हीही पदांसाठी उमेदवारी अर्ज घेतले.भाजपने चार नावे अंतिम केले असले तरी त्यातून कोणाला पसंती मिळेल हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान प्रशासनाने महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर केली असून, १० फेब्रुवारीला त्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज वितरणास महापालिका प्रशासनाने बुधवारपासून सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांचे वितरण होणार असून, या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पालिकेच्या सचिव कार्यालयात नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक सतिंदरसिंग (नवीनसिंग) मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी सचिव कार्यालयातून महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.